सातारा - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सातारा जिल्ह्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. खंडाळा तालुक्यातील ५४ वर्षीय कोरोनाबाधिताचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील तिसरा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यांना आज (रविवारी) रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे.
मुंबईवरून आलेल्या आणि मूळचे खंडाळा तालुक्यातील असलेल्या या कोरोनाबाधितावर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीचे १४ आणि १५ दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे तो आता कोरोनामुक्त झाला आहे. त्यांना रविवारी रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या १९, उपजिल्हा रुग्णालय कराड येथे दाखल ७, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे दाखल ७, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असणाऱ्या ९ अशा एकूण ४२ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी स्पष्ट केले.