सातारा : कराड तालुक्यातील उंब्रज येथे बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला होता. या गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून यामाहा कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गीतेश दत्तात्रय नावडकर (रा. पाडळी, ता. जि. सातारा) आणि राम उर्फ दयामन्ना कोळी (रा. राधिका चौक, सातारा), अशी चोरट्यांची नावे आहेत.
एका महिन्यात गुन्ह्याचा छडा : उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामामार्गाजवळ बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर आहे. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केला होता. ओळख लपविण्यासाठी चोरट्यांनी चेहरे झाकले होते. मात्र, एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते.
मोटरसायकल जप्त : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खबर्यामार्फत संशयितांची माहिती मिळताच, पोलिसांनी नागठाणे स्मशानभूमीजवळ थांबलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांकडून यामाहा कंपनीची मोटरसायकल (क्र. एम. एच. 11 डी. सी. 733) जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, हवालदार उत्तम दबडे, तानाजी माने, अजित कर्णे, प्रवीण कांबळे, प्रवीण पवार, मुनिर मुल्ला यांनी ही कारवाई केली.