कराड (सातारा) - रयत शिक्षण संस्थेच्या ढेबेवाडी (ता. पाटण) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आठवीमध्ये शिकणार्या अथर्व पाटील याने बॅटरीवर चालणारा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट रुग्णालयात तसेच गृह विलगीकरणात असणार्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, साहित्य पोहोचविण्याबरोबरच फरशीची सफाई देखील करू शकतो. रयत शिक्षण संस्थेने रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत घेतलेल्या वैज्ञानिक खेळणी व उपकरण स्पर्धेत या रोबोटला संस्था पातळीवर प्रथम क्रमांकही मिळाला आहे.
पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गावचा रहिवासी असलेला अथर्व रयत शिक्षण संस्थेच्या ढेबेवाडीतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिकतो. विज्ञान शिक्षक तसेच रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सुधीर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी निरीक्षक मोहनराव कदम यांच्या प्रोत्साहनातून अथर्वने रोबोट उपकरण तयार केले. घरातील वापरात नसलेल्या वस्तू आणि बाजारातील काही इलेक्ट्रीक वस्तुंचा वापर करत दोन आठवड्यात त्याने हा रोबोट बनविला आहे.
बेसला बसविलेल्या चाकांवरून हा रोबोट इकडून तिकडे फिरतो. त्याच्या हातावरील ट्रेमधून औषधे, गोळ्या तसेच अन्य वस्तू रुग्णांपर्यंत पोहचवता येतात. स्क्रबरच्या साह्याने तो फरशीची साफसफाई देखील करतो. रोबोटला बसविलेली बॅटरी चार तास चार्ज केल्यावर तो आठ तास कार्यरत राहतो. त्यावर बसविलेल्या वायफाय कनेक्ट कॅमेर्याद्वारे रुग्णांशी संवादही साधू शकतो. 20 फुटांच्या अंतरात रिमोटच्या सहायाने रोबोट नियंत्रित करता येतो. हा रोबोट तयार करण्यासाठी 1 हजार रुपये खर्च आल्याचे अथर्वने सांगितले.
रोबोट तयार करणार्या अथर्वसह त्याला मार्गदर्शन करणार्या डॉ. सुधीर कुंभार, तत्कालीन प्रभारी प्राचार्य एस. एस कदम यांचे रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांनी तसेच प्राचार्य जी.जी. साठे यांनी कौतुक केले आहे. रयत शिक्षण संस्थांतर्गत विज्ञान स्पर्धेत रोबोटला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
हेही वाचा - सातारा जिल्हा कारागृहात कोरोनाचा दुसऱ्यांदा शिरकाव; तिघांना लागण
हेही वाचा - गोजेगाव अन् शेंद्रे येथील कंपनीच्या साहित्यावर 15 लाखांचा डल्ला, दोघे ताब्यात