सातारा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धूम वाजवून पोलीस बॅन्ड पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. यावेळी शिवप्रेमींनी दिलेल्या घोषणांनी प्रतापगड दुमदुमून गेला.
शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी असून या कार्याचा तरुण पिढीने आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.
छत्रपतींच्या संकल्पनेतील समाज घडवा : प्रतिवर्षी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कल्पनेतील समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने महाराजांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करावी. तरुणांनी छत्रपतींच्या संकल्पनेतील समाज घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे.
ऐतिहासिक गड, साहित्याचे जतन करा : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, किल्ले, ग्रंथ, ऐतिहासिक वास्तू, साहित्याचे जतन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी शिकवण आहे. त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची वाटचाल केली तर कुठलीही दुविधा निर्माण होणार नाही. छत्रपतींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस पथकाकडून मानवंदना : किल्ले प्रतापगडावर शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण प्रतापगड भगवामय झाला होता. प्रशासकीय कार्यक्रमात पोलिसांच्या बॅन्ड पथकाने 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने प्रतापगड दुमदुमून गेला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या पोवाडा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षिसे देण्यात आली.
हेही वाचा - Amit Shah : बाळासाहेबांची विचारसरणी बाजूला सारत उद्धव ठाकरे पवारांच्या चरणी; गृहमंत्री अमित शाहांची टीका