सातारा - खवले मांजर, कासव, मांडूळ तत्सम प्राण्यांच्या शिकारी रोखण्यात वनविभागाला यश आले आहे. परंतु, आकाराने लहान, सहजपणे पकडणे शक्य असलेल्या लहान प्राण्यांवरील गंडांतर अद्यापही टळलेले नाही. संपूर्ण जिल्ह्यात अशा लहान प्राण्यांच्या शिकारी होत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यातच लॉकडाऊनमधील सुट्याने मोठी भर पडली आहे.
जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यातील मोर, सायाळ, ससे, चितार, पारवे, घोरपड अश्या अनेक दुर्मीळ पशू-पक्ष्यांनी जिल्ह्याची वनसंपदा समृद्ध आहे. परंतु, गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्यामुळे घरी राहून वनविभाग हद्दीत, तसेच विहिरी माळरानावर मोठ्या प्रमाणात जाळे तसेच फास टाकून शिकार केली जात आहे. या लहान प्राण्यांच्या होत असलेल्या नाहक शिकारीकडे सपशेल दुर्लक्ष वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभाग याचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.
जिल्ह्यातील अन्य संरक्षित वनक्षेत्रांमध्ये मोर, ससा, चितार, पारवे, घोरपड शिकारीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या शिकारींची कुठेही अधिकृत नोंद नाही, की ओरडही नाही. शिकारीबाबतचे आकडे विचारले की एकही शिकार नसल्याचे वनविभाग छातीठोकपणे सांगत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.