सातारा - जखमी वन्यजीव आढळल्यास त्याच्यावर उपचार व देखभाल करणारे वन्यजीव संक्रमन व उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर)ची साताऱ्यामध्ये आवश्यकता आहे. भौगोलिक दृष्ट्या सातारा शहर हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, साताऱ्यात असे केंद्र सुरू करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
अपघातात जखमी होणाऱ्या वन्य प्राण्यांचे प्रमाण सर्वाधिक
गत दोन वर्षांत मेढा (जावळी) या ठिकाणी सर्वाधिक जखमी वन्यजीव आढळून आले आहेत. त्या खालोखाल महाबळेश्वर, वाई, सातारा, पाटण कराड, वडूज, खंडाळा व फलटण या वनक्षेत्रात वन्यजीव जखमी झाल्याचे प्रकार घडले. नैसर्गिक अधिवासामध्ये अधिपत्यावरून अथवा शिकारीवरुन वन्यजीवांमध्ये आपसात संघर्षाचे प्रकार वारंवार घडतात. या संघर्षामध्ये वन्यजीव जखमी होतात. काही वेळा अपघाताने वन्यजिवांना शारिरीक ईजा पोहोचते. वाहन अपघातात सुद्धा अनेक प्राणी जखमी होतात. यात बिबट, भेकर, रानडुक्कर, मोर, चितळ, घोरपड तसेच काही पक्षांचाही समावेश आहे. विहीरीत बिबट्या पडणे, मांज्यात अडकून किंवा विजेचा झटका बसून पक्षी जखमी होण्याच्या घटना अधूनमधून घडतात. अशा जखमी वन्यजीवांनवर उपचार करण्यासाठी असे केंद्र उपयुक्त ठरते. या केंद्रात उपचार होईपर्यंत वन्यजीवाला ठेवण्याची व्यवस्था असते. सध्या असे केंद्र नागपूर येथे आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील जखमी वन्यजीवाला उपचारासाठी पुण्याच्या कात्रज येथील राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाते. मात्र या प्रवासाच्या दगदगीमुळे अनेक प्राण्यांचा मृत्यू देखील होतो.
वन्यजीव उपचार केंद्र साताऱ्यातच का व्हावे?
सातारा शहराजवळ महाबळेश्वर, जावळी, वाई, सातारा, पाटण ही तालुक्याची ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामध्ये बिबट्यापासून भेकरापर्यंत शेकडो वन्यजीवांचा अधिवास आहे. सातारा हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर' उभारण्यासाठी वनविभागाकडे सातारा 'वनभवन' पासून काही मिनिटांच्या अंतरावर जागाही उपलब्ध आहे. याशिवाय सातारा हे शहर भौगोलिक दृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. सर्वप्रकारच्या औषधांची साताऱ्यामध्ये सोय करणे शक्य आहे. साता-यात या केंद्राची सुविधा उपलब्ध झाल्यास प्रवासाचा खर्च व वेळ वाचणार आहे. साता-यात वन्यजीव संक्रमन व उपचार केंद्र उभारण्याची गरज आहे. महादरे येथे वनविभागाची स्वत:ची जागाही आहे. शिवाय वन्यजीवांसाठी तेथे नैसर्गिक अधिवासही आहे. साता-यात हे केंद्र झाल्यास वनविभागाच्या सोईबरोबरच जखमी वन्यजीवाचा प्राण वाचविण्यासही हे केंद्र सहाय्यभूत होईल, असा विश्वास माजी मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केला.
वर्षभरात एवढे प्राणी झाले जखमी
जानेवारी2020 ते ऑगस्ट 2020 या काळात 3 बिबट्या, 12 भेकर, 1 सांभर, 1 रानमांजर, 1 कासव, 1 तरस, 1 घोरपड, 6 मोर, 1खवल्या मांजर, २ साळींदर, 1 घुबड, 6 ससे आणि 5 रानडुक्कर इत्यादी प्राणी जखमी झाल्याची नोंद आहे.