सातारा - पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी ४८ तासात गजाआड केले आहे. या टोळीतील एक जण मूळचा माण तालुक्यातील आणि इतर पाच संशयित उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांचा गुंड विकास दुबे याच्या टोळीशी संबंध असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने कराड पोलीस उत्तर प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत.
पुणे-बंगळुरु महामार्गावर उंब्रज-शिवडे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री १२च्या सुमारास सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. पिस्तुलाचा धाक दाखवत या सहा जणांनी जबर मारहाण करत दोन कर्मचाऱ्यांकडील २५ हजाराची रोकड लुटली होती. तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांना खोलीत डांबून संशयित पळून गेले होते. दोन मोटरसायकलवरून येऊन सहा संशयितांनी हा दरोडा टाकला होता. तसेच सशस्त्र दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
सुत्रांमार्फत कराड पोलिसांना एका संशयिताचे नाव समजले. तो मूळचा माण तालुक्यातील रहिवाशी आहे. तसेच सध्या तो विद्यानगरमध्ये (कराड) वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी साध्या वेशात त्याच्यावर पाळत ठेवली. आज दुपारी तीनच्या सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कराड शहर पोलीस पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील, कराड गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, उंब्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जराड यांच्यासह सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यानगरमध्ये छापा मारून संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
संशयित राहत असलेले ठिकाण वर्दळीचे होते. त्यामुळे पोलिसांनी त्या परिसरात कंटेन्मेंट झोनचा फलक लावला. तसेच संपूर्ण परिसर सील केला. नंतर छापा मारून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांजवळ दोन पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी नियोजनबद्धरित्या आणि सिनेस्टाईल कारवाई करत ही मोहिम फत्ते केली. यावेळी विद्यानगर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी बुधवारी रात्री कराडमध्ये येऊन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.