सातारा - माण तालुक्यातील पानवण येथून डॉ. नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची तक्रार होती. शनिवारी (दि. 27) म्हसवड पोलिसांत दाखल झाली होती. हे अपहरण म्हणजे बनाव असल्याची कबुली डाॅ. शिंदे यांनी पोलिसांजवळ दिली. खोटी तक्रार दिल्याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या घरातून शेतात जात असताना अज्ञात व्यक्तींनी डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्या मोटारीतील मागची सीट अॅसिड टाकून जाळल्याचा बनाव केला गेला. या घटनेमुळे माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.
अपहरणाचा रचला बनाव
पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक म्हसवड पोलीस ठाण्यात तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. पोलीस तपासात अपहरण नाट्याने वेगळे वळण घेतले आहे. स्वत: डॉ.शिंदे यानेच त्याच्या गाडीवरील चालकाचा भावाच्या मदतीने अपहरण केल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे.
असा केला डाव
पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे याप्रकरणात डॉ. शिंदेला बोलता करून अपहरण नाट्य उघडकीस आणले. डाॅ. शिंदे हा 27 फेब्रुवारीला त्याच्या गाडीवरील चालकाच्या भावाच्या दुचाकीवरून दिघंची (जि. सांगली)कडे गेला होता. जाताना त्याने त्याच्याच गाडीत असलेल्या बाटलीमधील डिझेल ओतून स्वत:चीच गाडी पेटवून दिली. त्यानंतर दुचाकीवर बसून तो दिघंची येथील एका डॉक्टर मित्राकडे राहण्यास गेला. त्या मित्राने शिंदेची दिघंची येथील एका लॉजवर राहण्याची सोय केली होती. मात्र, रविवारी (28 फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांत डॉ. शिंदेच्या अपहरणाच्या बातम्या पाहून त्या मित्राने शिंदे याला दिघंची येथून परत पाठवले. तेथून निघालेल्या शिंदेने थेट सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी गाठले. तिथे घरातून नेलेल्या काळ्या पट्टीने स्वत:चे डोळे व दोरीने हात बांधून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला.
पोलीस अधीक्षकांचा दुजोरा
त्यानंतर स्थानिकांनी त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर म्हसवड पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. ताब्यातील डॉ. शिंदेकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली आहे. या बनावाबाबत वस्तूस्थिती पुढे आली असून योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - फलटण तालुक्यात विहिरींना लागले पेट्रोल; मासे, बेडूक, सापांचा मृत्यू