सातारा - वाईजवळ सुरुर रस्त्यावर झालेल्या सापळा कारवाईतील खवल्या मांजराच्या ७ तस्करांचे जामीन अर्ज आज वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन्. गिरवलकर यांनी फेटाळले. या संशयितांची सातारा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
केंजळजवळ झाली होती कारवाई -
वनविभागाने सुरुर वाई रस्त्यावरील मौजे केंजळ फाटयावर वाई वेस्टर्न फुडमॉलच्या आवारात सापळा रचून जिवंत खवले मांजर या वन्यप्राण्यासह ५ तस्करांना ताब्यात घेतले होते. विक्रीसाठी आणलेल्या दुर्मिळ खवल्या मांजरासह एक महेंद्रा झायलो व दुचाकी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या आणखी दोन साथिदारांना अटक करण्यात आली. सुमारे ११ लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला होता.
माहिती देताना वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे सात जण अटकेत -दिलीप बाबुराव मोहिते (वय 50), मयुर सतिश केंजळे, अक्षय दिलीप मोहिते (वय 23, तिघेही रा.पिंपोडे बु. ता.कोरेगाव), वसंत दिनकर सपकाळ (वय 50 रा. धावडी ता. वाई), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी(वय 34 रा. भालेघर ता. वाई), प्रकाश भीमराव शिंदे (वय 44 शिरगाव ता. वाई) व सुशांत विजय शेलार, (रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली होती.
वाघाच्या गटातील खवल्या मांजर -
या संशयितांची वन कोठडीची मुदत संपल्यानंतर सातही जणांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्यापुढे सुनावणी झाली. वाघ आणि खवल्या मांजर हे वन्यप्राणी अनुसुची-1 मधील दुर्मीळ वन्यप्राणी आहेत. मुंबई उच्च न्यायालय व नागपूर खंडपीठाच्या निकालाचा दाखला देत या संशयितांचा जामीन अर्ज मंजूर करु नये, असा युक्तिवाद सरकारी वकील मिलींद पांडकर, तसेच सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल महेश सुरेश झांजुर्णे व गणेश महांगडे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.