सातारा : महाविकास आघाडी 2024 मध्ये एकत्र निवडणूक लढेल हे आताच सांगू शकत नाही, या शरद पवारांच्या वक्तव्यावर स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे सतत आपले वक्तव्य बदलतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. साताऱ्यात पावसातील झालेल्या शरद पवारांच्या भाषणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी विरघळला. मात्र, त्यानंतर पुढे काय घडले हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काय चाललंय? बाजार समितीच्या निवडणुकीकरिता एका दाखल्यावर तहसीलदार सही करतात आणि तो रद्द करण्यासाठी दुसऱ्यांदा सही करतात. दोन-चार दिवसांसाठी दाखले देण्याची नवीन पद्धत तहसीलदारांनी सुरू केली आहे काय? तसे असेल तर दरपत्रक तरी जाहीर करा. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे काय चालले आहे? हा मुद्दा राज्यपातळीवर नेणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
नगरपालिकेच्या गाळ्यांवर कब्जा : सातारा बाजार समितीच्या लोकांनी नगरपालिकेच्या गाळ्यावर बेकायदा कब्जा करत गाळ्यांचा गैरमार्गाने वापर सुरू केला आहे. बैलबाजाराचे आरक्षण असूनही त्या जागेवर व्यापाऱ्यांची गोडावून दिसत आहेत. बाजार समिती शेतकऱ्यांच्या विकासाची मंदिरे न ठरता शेतकऱ्यांना लुटणारे कत्तलखाने झाले आहेत. बाजार समिती राजकारणाचा अड्डा न बनता शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिली पाहिजे. म्हणून स्वाभिमानी संघटना निवडणुकीत उतरली असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
नेते राजकीय वस्त्रहरणात गुंतले : सध्या राज्यभर सभा सुरू आहेत. या सभांमधून एकमेकांचे राजकीय वस्त्रहरण करण्यात नेते गुंतले असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कळकळीचे मुद्दे मांडले जाताना दिसत नाहीत. बरीचशी राजकीय मंडळी ईडीमुळे भेदरली आहे. त्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करण्यापलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडताना दिसत नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.
हेही वाचा : Raju Shetty: आधारला पॅन लिंकसाठी पैसे म्हणजे जनतेच्या पैशावर दरोडा, राजू शेट्टी आक्रमक