सातारा : साताऱ्यामधील वाढे गावात एका महिलेचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंगावरील दागिन्यांसाठी महिलेचा खून करून तिचा मृतदेह भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या वाढे गावातील बंगल्याच्या पाठीमागे पुरणाऱ्या संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकास हिरामण सकट (वय ३८, मूळ रा. कलेढोण, ता. खटाव, हल्ली रा. फुलेनगर, ता. वाई) असे संशयिताचे नाव आहे.
बंगल्याच्या पाठीमागे पुरला होता मृतदेह : वाढे गावात भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागे एका अनोळखी महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह दि. ४ जानेवारी रोजी आढळून आला होता. सातारा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासामध्ये पुरलेला मृतदेह मंगल शिवाजी शिंदे, (रा. संगम माहुली, सातारा) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
फरारी संशयिताला पुण्यातून अटक : अंगावरील दागिन्यांसाठी महिलेचा खून झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली. संशयित पुण्यात लपून बसला असल्याची माहिती सातारा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली. एका पथकाने सापळा रचून संशयिताला अटक केली.
अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण तपासाला यश : पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, डीवायएसपी मोहन शिंदे यांनी पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासात सातत्य राखण्याची सूचना केली होती. त्यानुसार खबऱ्यांचे नेटवर्क वापरत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, उपनिरीक्षक दळवी, अंमलदार संदीप आवळे, नीलेश जाधव, मालोजी चव्हाण, नितीराज थोरात, राहुल राऊत, सचिन पिसाळ, गिरीष रेड्डी यांनी संशयिताला शिताफीने पकडले.