सातारा - जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर आज (मंगळवारी) रेल्वेची यशस्वी चाचणी घेतल्याने येत्या काही दिवसांत या मार्गावर रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमार्गामुळे फलटण तालुक्यातील शेती, औद्योगिकीकरण, व्यापारीकरण तसेच दळणवळणाला चालना मिळणार आहे.
यासंदर्भात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी लोणंद-फलटण लोहमार्ग लवकरात लवकर सुरु करण्याची विनंती केली होती. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनीही लोणंद-फलटण लोहमार्ग 40 दिवसांत सुरू करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर आज दुपारी लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर प्रत्यक्षात रेल्वे धावली.
आजची चाचणी झाल्यानंतर अजून दोन चाचण्या घेऊन प्रत्यक्ष रेल्वे सुरू करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. या क्षणाचे अनेक फलटणकर साक्षीदार झाले. तसेच फलटण तालुक्याचा हा जिव्हाळ्याचा प्रलंबित प्रश्न सुटल्याने अनेकांनी या रेल्वेच्या शेजारी उभे राहुन फोटो व सेल्फी काढले.