कराड (सातारा) - पाण्याच्या शोधात आलेले पाच गवे विहीरीत पडल्याची घटना पाटण तालुक्यातील मोरगिरी नजीकच्या धावडे गावात घडली आहे. वन विभागाच्या कर्मचार्यांनी नागरिकांच्या आणि जेसीबीच्या सहाय्याने चार गव्यांना वाचविले आहे. तर एका मादी गव्याचा यात मृत्यू झाला आहे.
पाण्याच्या शोधात आलेले पाच गवे विहीरीच्या कठड्यावरुन विहीरीत पडले. गव्यांच्या आवाजाने धावडे गावातील नागरिक विहिरीजवळ एकत्रित झाले. यावेळी तत्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन अधिकारी आणि कर्मचारी धावडे गावात दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जेसीबी सहाय्याने बचावकार्य सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने विहीरीचे कठडे फोडून विहिरीला समांतर चर काढले. त्यामुळे गव्यांना विहीरीबाहेर काढण्यात यश आले. दरम्यान यावेळी चार गव्यांना वाचविण्यात यश आले. मात्र एका मादी गव्याचा बुडून मृत्यू झाला आहे. कडक उन्हाळ्यामुळे वनक्षेत्रात सध्या पाणी उपलब्ध नाही. मोरगिरी परिसर हा डोंगराळ आणि दुर्गम भाग आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गाव-वस्त्यांकडे धाव घेत आहेत. या घटनेमुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत बळकट करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा-बीजापूर चकमक : हुतात्मा जवानांची संख्या २२ वर, राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या शोकसंवेदना