सातारा - आज सगळीकडे कोरोनाचे भय आहे. जीवाची शाश्वती नाही. मात्र, प्राण फक्त कोरोनामुळेच नाही तर भुकेनेही जाऊ शकतो. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे वाढत जाणारे लॉकडाऊन यात अनेक गोरगरीबांचे रोजगार बुडाले आहेत.
यातच येथील काही शाळकरी मुलांची परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. ते म्हणाले, आधीच एक वेळच्या जेवणाची पंचायत होती. त्यात आता लॉकडाऊनमुळे रोजगारही गेला. या सगळ्या परिणामांबद्दल अनेक वृत्तपत्रांत रकानेच्या रकाने बातम्या छापून येत आहेत. वृत्तवाहिन्याही आपल्या चॅनेलवर अनेक बातम्या दाखवत आहेत. मात्र, 'आमचं ऐकण्याची मानसिकता कोणाची नाही का?' अशी सवाल येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या या संकटात शाळा सुरू करणे हे अत्यंत धोक्याचे आहे. मात्र, असे असले तरी जर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवायचे असेल तर नियमांचे पूर्ण पालन करून शाळा सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अँड्रॉइड फोन, स्मार्टफोनची उपलब्धता आणि परिणामकारक पद्धतीने वापर हा जसा चिंतनाचा विषय आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण हे किती प्रमाणामध्ये परिणामकारक व प्रभावी असेल हाही चिंतनाचा विषय आहे.
ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये ग्रामीण भागातील सर्वच पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. 'अहो इथे बापाचा रोजगार गेला, एका वेळंच जेवण नाही आणि कसलं आलं ऑनलाइन शिक्षण? दारोदार भीक मागून रात्रीच्या जेवणाची सोय आम्ही करतोय कसं शिक्षण घेणार?' असा सवाल येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीने सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहू शकतो आणि त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असे चित्र आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी इंटरनेट सुविधा नसल्याने ही अडचणी निर्माण होणार आहेत. इंटरनेटची सुविधा असेलही मात्र, हे इंटरनेट चालू ठेवण्यासाठी लागणारा रिचार्ज करणे या पालकांना शक्य आहे का? जिथे दोन वेळच्या अन्नाची सोय करणे महत्त्वाचे असेल तिथे इंटरनेटसाठी रिचार्ज करणे परवडेल का? या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे आहे.
सध्या उपलब्ध पाठ्यपुस्तक वितरणाबाबत ही शासनाच्या ठोस सूचना नाहीत. तसेच शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार योजना कुठे दिसून येत नाहीत. त्यामुळे नक्की या विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.