कराड (सातारा) - यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज गृहीत धरून आपली वायरलेस यंत्रणा व सॅटेलाईट फोन यंत्रणा सुसज्ज ठेवावी. तसेच गतवर्षीच्या पूर रेषेतील कुटुंबांचा मास्टर प्लॅन तयार करुन रेड लाईन व ब्ल्यू लाईनमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची स्थळे सुसज्ज करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत. पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात घेण्यात आलेल्या पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रतिवर्षी सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त आपत्तीचा सामना महाबळेश्वर आणि पाटण तालुक्याला करावा लागतो. कोयना धरण व्यवस्थापनाने धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक आणि धरणातून करण्यात येणारा विसर्ग याची सांगड घालणे गरजेचे आहे. धरणाच्या दरवाजापर्यंत पाणीसाठा झाल्यास धरणातुन 5 टीएमसी पाणी सोडण्याची मुभा असल्याचे देसाई यांनी सांगितले.
ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएल पावडर आणि पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर तातडीने औषधोपचार होण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करुन ठेवा, अशी सूचनाही देसाई यांनी केली. तसेच शिक्षण विभागाने धोकादायक शाळा इमारतीमध्ये वर्ग भरवू नयेत. शाळा जुलै महिन्यात सुरु झाल्यास कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शाळांना हॅण्ड सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा करावा. डोंगर पठारावरील जनावरांचे लसीकरण आठ दिवसात पुर्ण करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात व तहसिलदार समीर यादव यांच्यासहित इतर प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - लॉकडाऊनकाळात शिकारी जोमात अन् वनविभाग अधिकारी कोमात
हेही वाचा - सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केयर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट; सुविधा पाहून व्यक्त केले समाधान