सातारा - चक्रीवादळे, अवेळी झोडपणारा पाऊस आणि गारपीट हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान होत आहे. जागतिक तापमान वाढ आणि बदलते हवामान यामुळे अलीकडे हे वाढते प्रकार घडत आहेत, असे निरीक्षण कोल्हापूर येथील ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक डॉ. मधुकर बाचुळकर यांनी नोंदवले. जीवनशैलीत वेळीच बदल न केल्यास जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यात आपले पृथ्वीवरील जगणे अशक्य होईल. भारतासारख्या कृषिप्रधान देशाला हे परवडणारे नाही, असा धोक्याचा इशाराही त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.
काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर तालुक्याला गारपिटीने झोडपून काढले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व खटाव तालुक्याच्या काही भागाला गारपिटीचा मोठा फटका बसला. कलिंगड पिकाचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पिंपोडे बुद्रुक येथील शेतकरी सुषमा खराडे यांनी सांगितले. तर प्रवीण भोसले यांच्या कांद्याच्या पिकाचे किमान दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. मधुकर बाचुळकर यांनी आपली निरीक्षणे नोंदवली.
हे ही वाचा - आई न तू वैरिणी!!! एका बछड्यावर दिला पाय, दुसऱ्याला पाजले नाही दूध, दोघांचाही मृत्यू
'कार्बन' वाढीला हे जबाबदार -
पेट्रोल-डिझेल तसेच लाकूड-कोळशाच्या ज्वलनातून कार्बन-डायऑक्साइड बाहेर पडतो. या कार्बनमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. डॉ. बाचुळकर यांनी सांगितले, "गेल्या दोन महिन्यांत अनेक डोंगर- टेकड्या व जंगलांना वणवे लागल्याचे आपण पाहात आहोत. या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन होत आहे. जागतिक तापमान वाढ रोखायची असेल आणि निसर्गावर होणारा परिणाम थोपवायचा असेल तर कार्बन-डाय-ऑक्साइडचे कमीत कमी उत्सर्जन होईल अशा पद्धतीची जीवनपद्धती अनुसरावी लागेल. इंधनाच्या ज्वलनातून कार्बन- डाय-ऑक्साइड बाहेर टाकला जातो. तो मोठ्या प्रमाणात झाडे आणि वनस्पती शोषून घेतात. त्यांच्या मदतीने या वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. अलीकडच्या काळात जंगलांचे प्रमाण कमी झाले आहे. मोठ्या प्रमाणात होणा-या वृक्षतोडीमुळे वृक्ष आच्छादित क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगची हीच प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे आपल्याला इथून पुढच्या काळात तीन प्रमुख गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. कार्बन- डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन कमीत कमी होईल असा प्रयत्न करावा लागेल. वनाच्छादित क्षेत्र वाढवावे लागेल. त्यासाठी प्रयत्नपूर्वक वृक्ष लागवड व संगोपन करावे लागेल. जंगलतोड थांबवावी लागेल. तरच आपल्याला जागतिक तापमान वाढ रोखता येईल. निसर्गावर पर्यायाने मानवावर होणारे आघात काही प्रमाणात कमी करता येतील, असा विश्वासही डॉ. मधुकर बाचुळकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
हे ही वाचा - पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या, उद्या होणार मतदान
राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व खटाव या दुष्काळी तालुक्यात गारपिटीने फटका दिला. गेल्याच महिन्यात महाबळेश्वर तालुक्याला गारपिटीने झोडपून काढले होते. काश्मीर, कॅनडाचा फील येत असल्याचे चित्र माध्यमातून रंगवण्यात आले. कालच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे.