सातारा - सोयाबीनचे वजन करताना रिमोटद्वारे वजनात फरक करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील वाठार येथे समोर आली आहे. क्वींटलमागे 6 ते 7 किलोचा गाळा मारणार्या अशाच एका व्यापार्याचा डीवायएसपी सूरज गुरव यांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी दुकानातील वजनकाटा आणि रिमोट जप्त केले असून शेतकर्याची 15 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हाही व्यापार्यावर दाखल केला आहे. विकास अधिकराव पाटील असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.
डीवायएसपी सूरज गुरव यांना खबर्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या पथकासह पाटील याच्या दुकानाला अचानक भेट दिली. सोयाबीन विकण्यासाठी येणार्या शेतकर्यांच्या सोयाबीनचे वजन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर केले जात होते. बारकाईने पाहणी केली असता त्या वजनकाट्याला चीप लावलेली त्यांना दिसली. त्याबाबत डीवाएसपी गुरव यांनी दुकान मालकाला फैलावर घेतल्यानंतर त्याने वजन काट्याला लावलेली चीप आणि रिमोटद्वारे वजनात कशी तूट करतात, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे क्विंटलमागे 6 ते 7 किलो गाळा मारून शेतकर्यांची फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दुकानातील वजन काटा आणि रिमोट जप्त करून सोयाबीन खरेदी करणार्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - पूरग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल तांबवेकरांनी मानले रोहित पवारांचे आभार
परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसारखे नगदी पीक ज्यांच्या हाती आले. त्यांनी दिवाळी सणाला चार पैसे मिळावे म्हणून सोयाबीन विकण्यासाठी नेल्यानंतर त्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला. या संदर्भातील माहिती खबर्याने दिल्यानंतर कराडच्या डीवायएसपींनी तातडीने खातरजमा केली. तसेच दोषी व्यापार्यावर तातडीने कारवाईसुध्दा केली. सोयाबीन खरेदी करणाऱ्यांकडून शेतकर्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगावी, असे आवाहन डीवाएसपी सूरज गुरव यांनी केले आहे.