सातारा : विधान परिषदेवरील मुदत संपलेल्या सदस्यांच्या जागी नव्या प्रतिनिधींची नियुक्ती करताना अधिनियमाचे उल्लंघन होता कामा नये. तसेच सभागृहाचा अवमान झाल्यास राजभवनाच्या दारात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा साताऱ्यातील माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी राज्यपालांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अन्यथा आत्मक्लेश आंदोलन : विधान परिषदेवरील मुदत संपलेल्या सदस्यांच्या जागी नव्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी. त्यामध्ये साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, सहकार, सामाजिक चळवळीशी संबंधित व्यक्ती सभागृहात असाव्यात. नियुक्ती करताना अधिनियमाचे उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान झाल्यास राजभवनाच्या दारात आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा सुशांत मोरे यांनी राज्यपालांना ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
राजकीय सोय बंद करा : राज्यपालांना ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात सुशांत मोरे यांनी म्हटले आहे की, राज्यपाल नियुक्त १२ प्रतिनिधी निवडताना साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, सहकार, सामाजिक चळवळीशी संबधित व्यक्ती सभागृहात असाव्यात, हा निकष आहे. मात्र राजकीय सोय लावायची म्हणून सत्ताधारी आणि विरोधक आपले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संधी देतात. हा सभागृहाचा अपमान आहे. विधानपरिषदेवरील नवीन सदस्यांच्या निवडीवेळी चुकीचा पायंडा बंद करून कायदेशीर निकषांवर निवडी करायला हव्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
फेर जनहित याचिका दाखल करणार : सध्या मुदत संपलेल्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत प्रचलित निकष न पाळल्याने मी 2014 साली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तिची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यावेळेस राजकीय पक्षांनी शिफारस केलेले सदस्य प्रचलित निकषात बसत असतील तरच त्याची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा मला पुन्हा फेर जनहित याचिका दाखल करावी लागेल. तसेच राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन करू, असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.
हेही वाचा-