सातारा - पानवन (ता. माण) येथील दोघांच्या अपहरणाप्रकरणी राजकीय प्रस्थ असलेले शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. अपहरण का व कशासाठी करण्यात आले, याचा तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा - दोन लाखांच्या ऐवजासह सापडलेली पर्स कराडच्या नगराध्यक्षांनी केली परत
शनिवारी (२७ फेब्रुवारी) रात्री झाले होते अपहरण
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठीच्या ठरावानंतर पानवण येथील डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी अपहरण झाले होते. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीतून डॉ. नानासाहेब शिंदे यांचा ठराव घेण्यात आला होता. यानंतर डॉ. शिंदे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या घरातून शेतात जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. अज्ञातांनी त्यांच्या मोटारीतील मागच्या सीटवर अॅसिड देखील टाकले होते.
आणखी दोघांचे अपहरण उघड
म्हसवड पोलीस अपहरणाचा तपास करत असतानाच त्यांच्यासमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली. पानवण येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण हे गुरुवार (25 फेब्रुवारी) ते रविवार (28 फेब्रुवारी) पर्यंत बेपत्ता होते. शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी व वाहन चालक हरिदास गायकवाड यांनी त्यांच्या इनोव्हा वाहनामध्ये (क्र. एमएच 11 - 7057) शिंदे व चव्हाण यांना जबरदस्तीने बसवून कुळकजाई येथील फार्म हाऊस, तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते.
याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार शेखर गोरे यांच्यासह सदर सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहे.
हेही वाचा - खेड-शिवापूर, आणेवाडी टोल नाक्यांवर बनावट पावत्यांचा झोल; फास्टटॅगलाही फाटा