सातारा - दुष्काळी माण तालुक्यात एक ते दीड महिन्यांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील सर्व नाले भरून वाहत आहेत. तर माण नदीला पूर आला आहे. यामध्ये आंधळी धरण, राजेवाडी तलाव भरून वाहू लागला आहे. या पावसाने तालुक्यातील 6 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये 2 लहान मुली, 2 युवक तर पन्नास ते पंचावन्न वय असणाऱ्या व्यक्ती वाहून गेल्या आहेत.
याकडे आपत्कालीन प्रशासन मात्र लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोणतीही आपत्कालीन यंत्रणा या 6 ठिकाणच्या घटनास्थळी 24 तासात दाखल झाल्या नाहीत. या उलट नागरिकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करावी लागली आहे.
आपत्कालीन व्यवस्था नावाला तर नाही ना, असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे सातारामधून दीड ते दोन तासात १२० किलोमीटर अंतरावर घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, आज एवढ्या घटना घडल्या गेल्या तरी ना उपविभागीय अधिकारी फिरकले ना तालुक्यातील कोणी अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहोचले. आपत्कालीन व्यवस्थाही या ठिकाणी आली नाही. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मदत कार्य घटनास्थळी पोहोचत असेल तर जीव वाचवण्यासाठी मदत कार्य होते की मृतदेह शोधण्यासाठी बचाव कार्य केले जाते. हेच या तालुक्यातील प्रशासनाला समजत नसावे.
तालुक्यातील पावसाने गेलेल्या बळींची संख्या सहावर गेली आहे. यामध्ये अनिल झगडे, गणेश दहिवडे (दोघे रा. म्हसवड), साक्षी जगदाळे (लोधावडे), कबड्डी सामन्यासाठी आलेला मुंबईचा खेळाडू अविनाश शिंदे (रा. घाटकोपर), आराध्या काटकर (रा. दहिवडी) यांचे माण तालुक्यातील पावसाने बळी गेले आहेत. तर तुकाराम खाडे (रा. पळशी) यांचा शोध चोवीस तासांपासून सुरू आहे. मात्र, अजूनही ते सापडले नाही.