कराड (सातारा) - फार्महाऊसवरील शेततळ्यात बुडून बहिण, भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना पाटण तालुक्यातील रोमनवाडी-येराड येथून समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून मासेमारी करणार्यांच्या साह्याने शोध घेऊन रात्री सातच्या सुमारास बहिण-भावाचे मृतदेह ( Sister Brother Drowned in Satara ) बाहेर काढण्यात आले. सौरभ अनिल पवार (वय 16) आणि पायल अनिल पवार (वय 14, रा. काठी, ता. पाटण), अशी त्यांची नावे आहेत.
भावाला वाचविताना बहिणही बुडाली -
काठी (ता. पाटण) येथील अनिल पवार हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत रोमनवाडी-येराड येथील फार्म हाऊसवर कामाला असलेल्या सचिन जाधव या नातेवाईकाकडे आले होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिल पवार यांची मुले सौरभ व पायल ही फार्महाऊसवरील पाण्याने काठोकाठ भरलेल्या शेततळ्याकडे गेली होती. सौरभ शेततळ्यातील पाण्यात बुडताना पाहून भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहिण पायलही शेततळ्यात बुडाली.
मासेमारी करणार्यांनी शोधले मृतदेह -
दोन्ही मुले शेततळ्यात बुडाल्याची माहिती मिळताच सचिन जाधव आणि मुलांच्या आई-वडीलांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोन्ही मुले पाण्यात बुडाली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी मासेमारी करणार्यांना बोलवण्यात आले. रात्री सातच्या सुमारास दोन्ही मृतदेह सापडले. मुलांचे मृतदेह पाहून आई-वडीलांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.
मुलगा आयटीआय तर मुलगी आठवीत शिकत होती
काठी (ता. पाटण) येथील अनिल पवार काही वर्षांपासून कामानिमित्त पत्नी व मुलांसमवेत विजयनगर (ता. कराड) येथे वास्तव्यास आहेत. मुलगा सौरभ हा रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील आयटीआय महाविद्यालयात शिकत होता, तर मुलगी पायल ही विजयनगर येथील हायस्कूमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी सौरभ व पायल हे आई-वडीलांसह रोमनवाडी-येराड येथे नातेवाईकांकडे गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.