सातारा - महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असणार्या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी सुनिल किर्तणे यांच्या घरुन वाजत-गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, विश्वजित राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, तसेच बाळासाहेब माने, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी बी बी महामुनी, प्रांत आश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तहसीलदार अर्चना पाटील, मुख्याधिकारी चेतना केरुरे, सपोनि गणेश वाघमोडे यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.
श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिध्दनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होवून आज बुधवारी २७ रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला.
रथ नगरप्रदक्षिणेस सुरुवात झाल्यानंतर यावेळी बायपास रस्त्याने सुरुवात झाली. भाविकांनी सिद्धनाथाच्या नावाने चांगभलंच्या गजरात रथावर गुलाल व खोबर्याची उधळण केली. अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून रथ बायपास रस्त्याने नवीन नगरपालिका, महात्मा फुले चौक व तसेच पुढे बसस्थानक चौकातून सातारा - पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्यांच्या हस्ते साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरुन रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपनागराध्यक्षा सौ. स्नेहल युवराज सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विलासराव माने,विजय सिन्हा,विजय धट,नितीन दोशी,सुरेश म्हेत्रे,भगवान पिसे,आप्पा पुकळे,सर्जेराव माने, युवराज सूर्यवंशी, बबनदादा वीरकर, दत्तोपंत भागवत, प्रा.विश्वंभर बाबर, अँड निस्सार काझी, अँड नानासो कलढोणे, राजू माने, बाबासाहेब माने आदींनी सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबर्याची उधळण केली.
रथ यात्रे निमित्त मंदिरात श्रीचे दर्शनासाठी भाविकांच्या पहाटे पासुनच दर्शनबारीत भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रे निमित्त रिंगावण पेठ मैदानातील यात्रा भरली आहे. यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी आज दिवसभर टिकुन होती.उंच व गोलाकार फिरणारे यांत्रिक पाळणे, मौतका कुँवा,नाना-नानी पार्क इत्यादी खेळांच्या साधनाकडे बालगोपाऴांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रते, खेळणी व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलुन गेली होती.
भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने यंदा यात्रा नियोजनात माणनदीला पाणी असल्याने व यात्रा मैदान नदीपात्रा लगत असल्याने खुपच बदल करण्यात आल्याने ठिकठिकाणी पर्यायी वाहनतळ सुविधा करण्यात आली होती. गावोगावच्या मानाच्या काट्या व सासणे मुक्कामासाठी बाजार पटांगणात सुविधा करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रथमच प्रशासन पातळीवर दक्षता घेण्यात आली होती.