सातारा - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत मंगळवारी (दि. 24 ऑगस्ट) राज्यभर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सातारा जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस मुख्यालयावर कोंबडी मोर्चा काढला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री राणे यांचा निषेध केला. मोती चौकात सकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.
'ज्या शिवसेना प्रमुखांनी आपणाला मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांच्याच चिरंजिवाविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करताना नारायण राणे यांना लाज वाटायला पाहिजे होती', अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उप जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, बाळासाहेब शिंदे, अनिल गुजर, प्रणव सावंत, अमोल गोसावी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला. नारायण राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन शहर पोलिसांना देण्यात आले.
हेही वाचा - कराडमध्ये उपोषण; खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची मागणी