सातारा - जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचे जावळी तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. अशा व्यक्तीला आणि त्यांच्या मुलाला धमक्यांचे फोन येणे ही चिंताजनक बाब आहे. या सर्वांच्या सुत्रधाराचा छडा पोलिसांनी लावावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की जावळी तालुक्यात सध्या एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून त्यामध्ये वसंतराव मानकुमरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. मोरघर खिंड येथील दगड खाण याचाही उल्लेख त्यामध्ये आहे. या धमकी प्रकरणाची जावळी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. वसंतराव मानकुमरे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.
त्यांनी जावळी तालुक्याच्या विकासासाठी चांगले काम केले आहे. अशा लोकांना उघड धमकी देण्याचे प्रकार घडत असतील तर, तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आहे का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारामागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. या प्रकरणाचा त्वरीत छडा लावावा, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.