सातारा - महामार्गाची दुरवस्था व आवश्यक सेवासुविधा मिळत नसतानाही टोलवसूली होत असल्यामुळे निदर्शने करून आनेवाडी (ता. जावळी) टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जणांना आज वाई न्यायालयाने जमीन मंजूर केला.
८० जणांच्या जमावावर गुन्हा
आनेवाडी टोलनाक्यावर १८ डिसेंबर २०१९रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत सातारा बाजूकडून विरामाडे (ता. वाई)कडे टोलनाक्याच्या लेन क्रमांक एकच्या बाजूस, कठड्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक जितेंद्र सावंत, मिलिंद कदम ,सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते आदी ८० लोकांनी टोल नाक्यावर वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता.
संशयित हजर होत नव्हते
टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली व जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस कर्मचारी धनाजी कदम यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी दाखल आहे. याकामी सुनावणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतरांवर वेळोवेळी समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व १७ संशयित न्यायालयात उपस्थित राहिले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
जातमुचलक्यावर सुटका
पाच हजाराच्या जातमुचलक्यावर शिवेंद्रसिंहराजेंना न्यायालयाने जामीन मंजूर केला. शिवेंद्रसिंह व इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुंखे, संग्राम मुंडेकर, प्रसाद जोशी यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
याच आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून आपल्याकडे घेण्यासाठी गेले असता हस्तांतर आणि ताब्यावरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह समर्थकांमध्ये टोल नाक्यावर आणि नंतर सातारा येथे ६ ऑक्टोबर २०१७ रोजी धुमचक्री झाली होती.