सातारा - तालुक्यातील लिंब फाटा येथील यशराज इथेनॉल कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. तसेच कंपनीच्या रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमिनी नापिकी होत आहेत. यामुळे रविवारी शिवसेनेच्या वतीने या कंपनीवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन देऊनही कंपनीची मनमानी सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
सातारा तालुक्यात लिंब फाटा येथे इथेनॉल कंपनी आहे. या कंपनीचे रसायन युक्त पाणी जमिनीमध्ये मुरल्याने आसपासची जमीन नापीक झाली आहे. तसेच परिसरामध्ये माशा, डास यांचा प्रादुर्भाव होऊन दुर्गंधी पसरली आहे. या कंपनीचे सांडपाणी ओढ्या-नाल्यामार्गे थेट नदीत व आजूबाजूच्या विहिरीत जात असल्याने हे पाणी पिण्यायोग्य राहत नसून स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांनी यावेळी बोलताना दिली.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आंदोलकांशी चर्चा केली. १० नोव्हेंबर पर्यंत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन उपस्थित कंपनी प्रतिनिधींनी दिले आहे. ही बैठक न लावल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेचे सातारा विधानसभा मतदार संघातील उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला. या वेळी तालुका प्रमुख आतीश ननावरे, विश्वनाथ धनवडे, अनिल गुजर, निमिश शहा, शिवाजीभाऊ सावंत व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.