सातारा - वीर धरण परिसरात फिरायला गेलेल्या नागरिक, प्रेमी युगुल आणि पर्यटकांना भर दिवसा हत्यारांचा धाक दाखवून दागिन्यांसह मोबाईलची लुटमार केलेल्या टोळीला शिरवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केली.
संशयित सोलापूर-पुणे जिल्ह्यातील
महादेव सुख्वीर खोमणे (वय 23 वर्षे, रा. चंद्र्पुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शाहरुख महमुलाल बक्शी (वय 24 वर्षे, रा. मार्डी, ता. माण सध्या रा. चंद्र्पुरी,सोलापूर), भैया हुसेन शेख (वय 25 वर्षे, रा. कांबळेश्वर ता. बारामती, जि. पुणे), अमीर मौलाली मुल्ला (वय 21 वर्षे, रा. चंद्र्पुरी ता. माळशिरस) व मयूर अंकुश कारंडे (वय 20 वर्षे, रा.तावशी, ता. इंदापूर जि. पुणे) व 17 वर्षीय अल्पवयीन तरुण अशी संशयितांची नावे आहेत.
गस्त घालताना संशास्पद हालचाली
खंडाळा तालुक्यातील शिरवळ जवळील वीर धरण परिसर हा अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनाचे नवीन केंद्र उदयास येत आहे. हा परिसर संपूर्ण जलाशयाचा असून शांत व निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक येथे येत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी पर्यटकांना आलेल्या तसेच प्रेमी युगुलांना या संशयितांना कुकरी व चाकूच्या धाकाने लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलीस गस्त घालत असताना संशयितरित्या दुचाकीवर फिरणाऱ्या युवकांना पोलिसांनी हटकले. संबंधितांनी तेथून पळ काढल्याने पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करुन संशयितांना ताब्यात घेतले असता संशयित युवक दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून 13 इंच लांबीची कुकरी, 7.5 इंचाचा नक्षीदार चाकू, गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी वाहने आदी सुमारे 1 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांनी जप्त केला. शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक सागर आरगडे तपास करीत आहेत.
हेही वाचा - सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर ; बुधवारी 922 कोरोनाबाधित; 5 बाधितांचा मृत्यू