सातारा: सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावे यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. सत्तासंघर्षावरील निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सातारा दौऱ्यावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. शासकीय योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिंदे-फडणवीसांकडून आगामी निवडणुकीची साखर पेरणी देखील होणार आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाईंचे शक्तिप्रदर्शन: पाटणचे आमदार तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे होमपीच असलेल्या मरळी-दौलतनगर (ता.पाटण) येथे शासन आपल्या दारी या अभियानाच्या शुभारंभाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ते जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महारोजगार मेळाव्याचे आयोजन: शासन आपल्या दारी अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता, ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील तरूणांना अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तर शासन आपल्या दारी अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा -