सातारा - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभांरभ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल (सोमवारी) पार पडला. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना पवारांनी कारखान्याचे चेअरमन आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याचे सूचक वक्तव्य केले.
हेही वाचा- 'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त कराडच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी शरद पवार आले होते. त्यानंतर त्यांच्या हस्ते सह्याद्री कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. सह्याद्री कारखान्याची स्थापना ही यशवंतरावांच्या प्रेरणेतून झाली आहे. कारखान्याने विविध प्रकल्प राबविले आहेत. उपसा सिंचन योजनेचा 'सह्यादी पॅर्टन' राज्यात आदर्शवत ठरला आहे. ऊस लागवडीची नोंद, उसाची बीले जमा झाल्याची माहिती सभासदांना मोबाईलवर मिळत आहे. त्यामुळे सह्याद्री कारखान्याचे व्यवस्थापन आणि सभासद यांच्यातील संवाद अधिक गतीमान झाला.
'एकदा सगळं नीट झाल्यानंतर बाळासाहेबांना कारखान्याच्या जबाबदारीतून थोडे मोकळे करा', अशा सूचक शब्दांत शरद पवारांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बाळासाहेब पाटील हे सलग पाचव्यांदा कराड उत्तरचे आमदार झाले आहेत. संयमी आणि यशवंत विचारांचा वारसा जोपासणारे नेते म्हणून ते राष्ट्रवादीत परचित आहेत.