कराड (सातारा) - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतरावांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे (बुधवारी) कराड दौर्यावर येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दौरा मात्र अनिश्चित आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी दरवर्षी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी कराडला येत असतात. पण, यंदा कोरोनामुळे सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या प्रचाराचे दौरेही सुरू आहेत. त्यामुळे सर्वच मंत्री आणि नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. त्यांचे दौरेही नियोजित आहेत.
आज (बुधवार) शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रीतिसंगमावर उपस्थित राहून दिवंगत यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. त्यांचा दौरा निश्चित असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. तथापि, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने तो अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही.
यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असल्याने महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना यावे लागते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा निश्चित आहे. तसेच शरद पवार हे सुद्धा कराडला येणार असल्याचे मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) रात्री उशीरा समजले. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दौर अनिश्चित आहे.
वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टची बैठक होणार रद्द
प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळाला अभिवादन केल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांची बैठक होत असे. पण, यंदा कोरोनामुळे ट्रस्टचे अनेक विश्वस्त उपस्थित राहू शकणार नसल्याने ही बैठकही रद्द होणार आहे.
हेही वाचा - 'ऊसाचा काटा मारला, त्यांचा काटा काढण्यासाठी मी उमेदवारी लढवीत आहे'
हेही वाचा - 'फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान'