सातारा - जिल्ह्यात एकूण ११ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाढता प्रादुर्भाव चिंताजनक असून संचारबंदीत लोक लपूनछपून जिल्ह्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थिती बाहेरच्या जिल्ह्यातील एकही नागरिक सातारा जिल्ह्यात येणार नाही. यासाठी आणखीन कडक प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गृहराज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते.
जिल्ह्यात एकूण दोन लाखांच्यावर लोक बाहेरगाववरून आल्याची नोंद आहे. पाटण मतदारसंघात ६० ते ६३ हजार लोक बाहेर गावावरून आले आहेत. ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथील प्रकल्पाचे रुग्णालय असून या रुग्णालयात दिवसाकाठी २०० ते २५० लोक उपचाराकरीता येत असतात. याठिकाणी आवश्यक तो औषधसाठा देणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आवश्यक असणाऱ्या औषधांची मागणी मागवून घेवून तो औषधसाठा द्यावा.
२० एप्रिलनंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथिलता मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती जिल्ह्यातील लोकांना द्यावी. अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या.
सातारा जिल्ह्यात बाहेरून आलेल्या ३८० जणांना १० ठिकाणच्या केअर सेंटरमध्ये ठेवले आहे. एकूण ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोन मृत व एका व्यक्तीस घरी सोडून त्यास होम क्वारंटाईंन करण्यात आले आहे. नव्याने चार व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. या चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून सुमारे ५०० गुन्हे या काळात नोंद झाले आहेत. एकावेळी एका गुन्ह्यामध्ये १०० ते १२५ व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थिती होते.