सातारा - फलटण तालुक्यातील वडजल येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाइल, रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा सुमारे एक लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हे आहेत संशयित -
संभाजी साहेबराव चोरमले (वय 45, रा. बुधवार पेठ, फलटण), संदीप जगन्नाथ कांबळे (वय 54, निंभोरे, ता. फलटण), डबलूसिंग विवेकानंद सिंग (वय 36, निंभोरे मूळ, बिहार), समीर चंदूभाई मारोट (वय 46, निंबोरे, मूळ गुजरात), ज्ञानेश्वर रामदास जगताप (वय 47, रा. इंदिरानगर, पुणे), शरद बाळू ढवळे (वय 30, रा. निंभोरे) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
शेडमध्ये चालला होता डाव -
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, वडजल येथील शेतात, पत्र्याच्या शेडमध्ये तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सोमवारी दुपारी जुगार सुरू असलेल्या ठिकाणी सापळा लावला. या ठिकाणी येणार्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर संशयित शेडमध्ये जुगार सुरू असल्याची पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी छापा टाकला असता सात संशयित तीन पानी जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, हवालदार सतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, विशाल पवार, सचिन ससाने, विजय सावंत, अर्जुन शिरतोडे आणि राजू ननावरे यांनी यशस्वी केली.