सातारा : महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यानजीकच्या लिंगमळा येथील ग्रीनवूड सोसायटीतील विहिरीत एक महाकाय रानगवा रविवारी दुपारी साडेतीन वाजता विहिरीत पडला. या रानगव्याचे वजन अंदाजे दोना कीलोहून अधिक होते. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स कार्यकर्त्यांना यश आले.
वाहनाच्या धडकेमुळे शिरला सोसायटीत -
महाबळेश्वर पासून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर पाचगणी मुख्य रस्त्यावर लिंगमळा परिसरात ग्रीनवुड सोसायटी असून या सोसायटीच्या मुख्य प्रवेशव्दारा बाजूलाच २० फुट रूंदीची विहीर आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास वेण्णानदी पात्रात एक गवा पाणी पिण्यासाठी आला होता. मुख्य रस्ता ओलांडून पुन्हा जंगलात जात असताना ग्रीनवुड सोसायटी समोरच अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. वाहनाच्या धडकेमुळे बिथरलेला गवा ग्रीनवुड सोसायटीत घुसला. मात्र, सोसायटीच्या संरक्षण भिंतीमुळे त्याला बाहेर पडणे मुश्कील झाले.
मार्ग शोधताना पडला विहिरीत -
कुठे तरी वाट मिळेल या उद्देशाने हा गवा विहीरीच्या दिशेने गेला. दरम्यान सोसायटीत गवा घुसल्याची खबर वन विभाग व पोलिसांना मिळाली. पोलिस व वनकर्मचारी सोसायटीत तातडीने दाखल झाले. त्यांनी गव्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही. विहीरीच्या अवतीभवती तो फिरत राहीला. बघताक्षणी हा गवा पाण्याने भरलेल्या विहिरीत पडला. जवळपास 70 फूटावर पाणी आणि जवळपास दीडशे फूट खोल असलेल्या विहिरीतून गव्याला सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते कामाला लागले.
बचाव कार्यात अडचणी -
ट्रेकर्स टीम तातडीने दाखल होत दुपारी ४ च्या सुमारास बचावकार्य सुरु झाले. विहिरीवर लोखंड जाळी असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. गवा बुडण्याची शक्यता ओळखून महाबळेश्वर ट्रेकर्स जवानांनी दोरखंडाने गव्याची शिंगे बांधून तो पाण्यावर तरंगेल अशी व्यवस्था केली होती. गव्याचे वजन लक्षात घेता वनविभागाने १ टन क्षमतेचे हायड्रॉलिक क्रेन मागविण्यात आली. कोल्हापूर येथून आपत्कालीन व्यवस्था पाहणारी तज्ज्ञांची टीम पाचारण करण्यात आली. ट्रेकर्स टीम कडून विहीरीवरील लोखंड जाळी कापून विहीरीवरील भाग मोकळा करण्यात आला. सायंकाळी अंधार पडल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. तरी प्रकाश झोतात काम सुरु ठेवण्यात आले.
बचावकार्य सुरुच -
या बचावकार्यात वनविभागाच्या कर्मचार्यांसह महाबळेश्वर ट्रेर्कसचे सुनिल भाटिया, नगरसेवक कुमार शिंदे, अनिल केळगणे, निलेश बावळेकर, प्रशांत आखाडे, संजय शिंदे, देवेंद्र चौरसिया, संदेश भिसे यांच्यासह अनिल भिलारे, अंकुश बावळेकर आदी सक्रीय होते. गव्याला पाहण्यासाठी विहीर परिसरात मोठी गर्दी झाली होती. मात्र पोलीस व वनविभागाने मुख्य प्रवेशद्वार बंद केले रात्री उशीरापर्यत हे बचावकार्य सूरु होते.
गव्याची जंगलात धूम
पोकलेनच्या साह्याने त्याला पट्ट्याने बांधून त्याला बाहेर काढण्यात यश आले. गव्याला बाहेर काढल्यानंतर त्याने जंगलाकडे धूम ठोकली. गवा जंगलाकडे गेल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यां वाजवून आनंद व्यक्त केला. सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सर्वांनी उपस्थित टीमचे टाळ्या वाजून अभिनंदन केले.