सातारा - महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्ष ज्योती कांदळकर यांचे पती दिपक यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी रात्री या तलावात सुरू झालेली शोध मोहीम आज सायंकाळी थांबली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, दिपक कांदळकर यांचा शोध लागत नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी त्यांची मोटार वेण्णा लेक नजीक दिसून आली. या वाहनात त्यांचे जॅकेट, स्वेटर मागील सीटवर होते तर नजीकच लोखंडी ब्रीजवर त्यांचा मोबाईल व चप्पल आढळली. त्यामुळे त्यांनी वेण्णा लेकमध्ये आत्महत्या केली असावी, अशी शंका निर्माण झाली.
पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्संना पाचरण केले. या जवानांनी वेण्णा तलावात बोट तसेच आधुनिक आयुधांच्या सहाय्याने तलावात शोध मोहीम सुरू केली. अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. आज सकाळी 7 वाजता पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले.
खोल पाण्यात शोध घेताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे महाड येथून स्कुबा ड्रायव्हरर्सना पाचारण करण्यात आले. पाण्याखालील आधुनिक कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हे पाणबुडे तलावाच्या तळात शोध घेत होते. सायंकाळी ६ वाजता अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बि. ए. कोंडूभैरी, उपनिरीक्षक अब्दुल बिद्री अधिक तपास करत आहेत.