सातारा - माण तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाहणी करुन संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करावेत. एकही शेतकरी पंचनाम्या पासून व शासकीय मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले.
माण तालुक्यासह पूर्व भागाला दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने झोडपून काढले होते. तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी वर्गाचे फळ बागा व शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, विभागीय कृषी अधिकारी कोळेकर, प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत सानप, गटविकास अधिकारी एस बी पाटील यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी पांढरवाडी, बिदाल, दहिवडी, म्हसवड तसेच राजेवाडी तलावाची पाहणी करुन सर्व माहिती घेतली. देवापूर येथील शेतकरी रघुनाथ बाबर यांच्या द्राक्ष बागेचे अती व अवेळी झालेल्या पावसामुळे दावण्यारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शेतकऱ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी दहिवडी परिसरातील बिदाल येथील कांदा, बटाटा, मका पिकांची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकारी वर्गाने शासकीय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी बांधावरती जाऊन नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सिंह यांनी दिले.
पंचनाम्यापासून वंचित राहिल्यास शेतकऱ्याने गावच्या कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावा. तरीही कोणीही न आल्यास प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.