सातारा - एकीकडे अवघ्या साताऱ्याला भयभीत करणाऱ्या महापुराने वेढले असून नदीकाठची गावे आपल्या सोबत वाहुन नेत नुकसान केले आहे. तर दुसरीकडे पुणे-बंगलोर महामार्ग 4 वरील वाहतुक 3 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी, वाहन चालक या तिन्ही जिल्ह्यात अडकून पडले आहेत. आपल्या भागात पुराचा फटका बसला असूनसुद्धा महामार्गावर अडकलेल्यांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील अनेक मित्रमंडळ धावून येताना दिसत आहेत.
पुरामुळे साताऱ्यात सध्या गंभीर परिस्थीती असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, पुणे-बंगलोर महामार्ग 4 वरुन प्रवास करणारे प्रवासी मागील ३ दिवसांपासून अटकून पडले आहे. आपल्याकडील पुरपरिस्थीतीची जाणीव ठेवत महामार्गावर अडकुन पडलेल्या प्रवाशांच्या मदतीला सातारकर धावून येत आहेत. सोशल मिडियाचा चांगल्या प्रकारे वापर करत एक व्हाटसअॅप ग्रुप बनवून पुरात अडकलेल्या वाहन चालक, प्रवाशांना साताऱ्यातील मित्रमंडळ मदत करताना दिसत आहेत.
आपले नुकसान झाले असले तरी दुसऱ्याच्या मदतीला वेळेप्रसंगी कसे धावून जाता येते याचे जिवंत उदाहरण आज इथे बघायला मिळत आहे. आपली दु:ख पाजळत न बसता अडकून पडलेल्या प्रवाशी वर्ग, वाहन चालक यांच्या मदतीला हे सातारकर धावून गेले आहेत. यामुळे भारावलेल्या प्रवाशांकडून केलेल्या मदतीची परतफेड कशी करू अशी भावना देखील यावेळी कर्नाटक तसेच इतर राज्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.