सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या वरती गेला आहे. तर, जिल्ह्यातील अनेक यात्रा, जत्रा यावर्षी भरल्या गेल्या नाहीत. तसेच खंडाळा तालुक्यातील पारंपरिक 'बोरीचा बार' न भरवण्याचा निर्णय बोरी व सुखेड या दोन्ही गावातील प्रमुख व पोलीस प्रशासनाच्या झालेल्या एकत्रीत बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गावातील महिलांना ओढ्याकाठी एकत्र येवून हातवारे करत एकमेकींना शिव्यांची ओरड वाहण्याचा ज्याला 'बोरीचा बार' असे म्हणतात साजरा केला जाणार नाही. कोरोनाने बोरीच्या बारावरही आपला हक्क सांगितला की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी खंडाळा तालुक्यातील बोरी व सुखेड या दोन्ही गावातील महिला सजून धजून या दोन्ही गावच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याकाठी अनेक वाद्याच्या गजरात एकत्र येतात. त्यानंतर एकमेकींना हातवारे करत शिव्या देतात. शिव्या देण्याची प्रथा कायम असते. शिव्या देण्याची प्रथा का सुरू झाली आणि केव्हा झाली याबाबत दोन्ही गावात कोणालाच आजही नेमकेपणाने सांगता येत नाही. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे ही प्रथा येथे सुरू आहे.
ही प्रथा बंद होण्याबाबत आजवर पोलीस यंत्रणा व महसूल प्रशासन तसेच अंधश्रद्धा निर्मलून समिती यांनी वेगवेगळ्या स्तरांवरुन प्रयत्न केले. मात्र, ती बंद पडली नाही. दोन्ही गावातील गावकरी विशेषतः महिला याबाबत ठाम असतात. मात्र, यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने ही प्रथा बंद पडली आहे.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज या दोन्ही गावातील महिलांनी एकत्र येवून महिलांचे पारंपरिक खेळ खेळतात. त्यानंतर 'बोरीच्या बार' यास प्रारंभ होतो. या प्रथेत कोणत्याही अनिष्ठ बाबी नसल्याचे या दोन्ही गावातील महिला व नागरिकांचे म्हणणे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याला पोलीस बंदोबस्त देखील दिला जातो.