सातारा - त्रिपुरामध्ये कार्यरत असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. संभाजी केशवराव भोसले-पाटील (वय ४१, रा. तारगाव, ता. कोरेगाव) असे मृत जवानाचे नाव आहे. दिवाळीसाठी आलेले जवान भोसले हे तीन दिवसांपूर्वीच कामावर हजर झाले होते. अपघाताने बंदुकीतून गोळी सुटून त्यांचा मृत्यू झाला की घातपाताने, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. त्यांच्या निधनाने कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - साताऱ्यात खंबाटकी बोगद्याजवळ विचित्र अपघात, आठ वाहनांचा चुराडा
संभाजी भोसले-पाटील हे जानेवारी 1999 मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. 20 बटालियनमध्ये त्यांची नेमणूक होती. सीमा सुरक्षा दलात त्यांनी 20 वर्षे सेवा बजावली. ते सध्या हवालदार पदावर होते. त्रिपुरामधील पाणीसागर विभागात त्यांची नेमणूक होती. दिवाळीसाठी ते 15 दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. तीन दिवसांपूर्वीच ते ड्युटीवर हजर झाले होते. तसेच सुट्टीवर आल्यानंतर आपण स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याचेही त्यांनी मित्रांजवळ बोलून दाखविले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आहेत. त्यांचे पार्थिव उद्या (सोमवारी) तारगाव या मूळ गावी येणार आहे. सह्याद्री साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कांतीलाल भोसले-पाटील यांचे संभाजी हे पुतणे आहेत.
हेही वाचा - एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का? वाचा काय म्हणाले अनिल कपूर