सातारा - फाळणी नकाशा नक्कल काढून देण्यासाठी वाईच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपीक कृष्णात यशवंत मुळीक (वय ४७, रा. जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवडी, वाई) याला १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवून विशेष न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड ठोठावला.
फाळणी नकाशासाठी लाच
यातील तक्रारदाराने त्यांना कोंडवे (ता. सातारा) येथील गट नंबर १७९चा फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज दिला होता. ते काम करून देण्यासाठी मुळीक यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली. त्या कामासाठी तक्रारदार सातारा कार्यालयात गेले असता त्यांची वाई येथे बदली झाल्याचे समजले. त्यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी अर्ज त्यांच्याकडेच असून ते काम करून देणार असल्याचे सांगून वाई येथे बोलाविले. तेथे लाचेची मागणी करण्यात आली.
अडकला ट्रॅपमध्ये कारकून
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. १० हजार रुपयांवर दोघात तडजोड झाली. ही लाच १ सप्टेंबर २०१४ रोजी वाई-सातारा रोडवरील आधार हॉस्पिटलच्या समोर रस्त्याकडेला स्वतःच्या मारुती अल्टो वाहनामध्ये बसून स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ही कारवाई तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी केली तर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी केला होता.
गुन्हा सिद्ध
येथील विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी या खटल्यात लोकसेवक कृष्णात यशवंत मुळीक यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी व सहायक सरकारी वकील लक्ष्मण के. खाडे यांनी कामकाज चालविले. पैरवी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के व सहाय्यक फौजदार विजय काटपटे यांनी मदत केली.