सातारा - पाटण तालुक्यातील मानेगावचा सुपूत्र आणि गुप्तवार्ता विभागातील असिस्टंट इंटेलिजन्स अधिकारी संभाजी साळुंखे ( Sambhaji Salunkhe ) हे मुंबईत २००५ साली आलेल्या महापुरात २६ जुलैच्या रात्री वांद्रे-कलानगरमध्ये एसटी बसमध्ये अडकलेल्या २२ प्रवाशांसाठी देवदूत ठरले होते. पहाटेपर्यंत महापुराशी एकहाती झुंजत हिरो ठरलेल्या संभाजीच्या धाडसाला मुंबईकरांनी सलाम केला होता. तसेच 'पंतप्रधान जीवनरक्षक पदका'ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
![26 July Mumbai Deluge](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-satarassambajiwasanangelfor22passengersduringthe267mumbaideluge-10054_26072022211612_2607f_1658850372_898.jpg)
२६/७ च्या रात्री अशी होती परिस्थिती - गुप्तवार्ता विभागातील ड्युटी संपल्यानंतर संभाजी साळुंखे यांना सहकाऱ्यांनी मध्यरात्री सायन सर्कलला गाडीतून सोडले. त्या रात्री तुफान पाऊस सुरू होता. त्यातूनही ते कलानगरला पोहोचले. तोवर पाणी आणखी वाढले. आसपास दोन महिलांची पाण्यातून जाण्याची धडपड सुरू होती. संभाजी साळुंखेंनी हाताचे दोन्ही पंजे एकमेकात गुंतवून डोक्यावर घट्ट धरले आणि महिलांना दंडाच्या झोक्याला पकडायला सांगितले. गळाभर पाण्यातून कसरत करत महिलांना एमआयजी क्लबच्या बसस्टॉपपर्यत आणले.
![26 July Mumbai Deluge](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-satarassambajiwasanangelfor22passengersduringthe267mumbaideluge-10054_26072022211612_2607f_1658850372_827.jpg)
...अन् ऐकू आला बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा - एमआयटी स्टॉपवर पुराच्या पाण्यात ३१७ नंबरची बस अडकलेली. पुराचे पाणी बसच्या खिडकीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे बसमधील प्रवासी जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत होते. नाकातोंडात पाणी जात होते. तरीही दोन्ही महिलांना घेऊन संभाजी हे बसपर्यंत गेले. रात्रीचे एक वाजलेले. सायंकाळी सातपासून प्रवाशी बसमध्ये अडकून पडले होते.
![26 July Mumbai Deluge](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-satarassambajiwasanangelfor22passengersduringthe267mumbaideluge-10054_26072022211612_2607f_1658850372_442.jpg)
पोहत जाऊन एमआयजी क्लबमधून आणला दोर - संभाजी साळुंखे पोहत एमआयजी क्लबच्या दिशेने गेले. क्लबचे गेट बंद होते. पाणी गेटच्या उंचीएवढे होते. गेटच्या चौकीच्या छताला लटकत त्यांनी हाका मारल्या. आवाज ऐकून क्लबच्या सुरक्षा अधिकाऱ्याने त्यांना आत बोलावले. संभाजी साळुंखे पोहत क्लबमध्ये पोहोचले. क्लबच्या स्विमिंग टॅंकवर त्यांना जाड दोर सापडला. एक टोक गेटला बांधले आणि दुसरे टोक हातात धरून पोहत बसकडे आले. बसच्या दरवाजाला दोर बांधून एकेका प्रवाशाला पुराच्या पाण्यातून एमआयजी क्लबच्या गॅलरीत नेले. प्रवाशांच्या सुटकेची मोहिम फत्ते झाली त्यावेळी पहाट होत आलेली होती.
तुम्ही ज्यांची दखल घेत नाही तिथे काम करतो -मृत्युच्या दाढेतून बाहेर काढल्यानंतर सगळ्या प्रवाशांनी संभाजी साळुंखे या देवदुताची विचारपूस करायला सुरूवात केली. तुम्ही कुठे काम करता, असे विचारल्यावर साळुंखे म्हणाले, 'तुम्ही ज्यांची दखल घेत नाही ही ते माझे खाते. त्यांचे उत्तर ऐकून एकजण म्हणाला, तुम्ही पोलीस का? संभाजी साळुंखे म्हणाले, हो, मी राज्य गुप्तवार्ता विभागात सहायक अधिकारी आहे. त्या क्षणी प्रवाशांना पोलिसांच्या कर्तव्य भावनेचा प्रत्यय आला आणि पोलिसातील माणुसकीला त्यांनी सलाम ठोकला!