सातारा- शहरालगत असणाऱ्या खिंडवाडीजवळच्या जंगलात दुपारी आढळून आलेला बेवारस मृतदेह हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून त्या मृताच्या आईच्या सांगण्यावरून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. केवळ दोन तासांतच सातारा तालुका पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयितांना अटक केली आहे. प्रकाश कदम (वय ३०, रा. वळसे, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संशयित आरोपी साहिल मुलाणी आणि प्रमोद साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) या दोघांना अटक केली.
सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर चक्रावून टाकणारी माहिती मिळाली. प्रकाश कदम हा दारू पिऊन वारंवार त्याच्या आईला त्रास देत होता. काही वर्षे तो मुंबईमध्ये काम करत होता. मात्र, गावी आल्यानंतर तो परत जात नसे. गावी काहीही काम न करता तो दारू पिऊन आईला शिवीगाळ करत होता. या त्रासाला कंटालेल्या आईनेच नात्यातील प्रमोद साळुंखे याला त्याचा कायमचा काटा काढण्यास सांगितले होते. यानंतर प्रमोदने त्याचा मित्र साहिल याला सोबत घेतले. २६ ऑगस्ट रोजी दुपारी तिघेजण दारू पिण्यासाठी खिंडवाडीतील जंगलात गेले. तिथे प्रकाशला दारू पाजून दोघांनी त्याचा गळा चिरला. यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघृर्ण खून केल्याची कबुली दोन्ही संशयितांनी दिली.
बेवारस मृतदेह प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुजित भोसले, दादा परिहार, सागर निकम, नितीनराज थोरात, सतीश पवार, संदीप कुंभार यांनी केला.
मृत व्यक्तीची आई सुद्धा ताब्यात
मुलाच्या खुनाची सुपारी देणाऱ्या आईलाही पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. तिच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणातील आणखी वस्तूस्थिती उद्या (गुरुवारी) दुपारपर्यंत समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.