सातारा Satara Murder News: प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकरानं मित्राच्या मदतीनं प्रेयसीच्या पतीची गळा आवळून हत्या केलीय. हत्या करून दोरीनं हात-पाय बांधून मृतदेह नीरा उजव्या कालव्यामध्ये टाकल्याची कबुलीही संशयितानं दिलीय. याप्रकरणी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केलीय. परंतु, प्रियकराचा मित्र फरार आहे. (Boyfriend kills girlfriend husband)
पत्नीसह प्रियकराला अटक : नीरा उजव्या कालव्यामध्ये अजित पोपट बुरूंगले (वय २४, रा. शिवाजीनगर, फलटण) याचा हातपाय दोरीनं बांधलेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी फलटण पोलिसांनी शिताफीनं तपास करुन मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केलीय. करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे), असं त्याचं नाव आहे. त्याचा मित्र राहुल उत्तम इंगोले हा फरार आहे. या घटनेमुळं फलटण तालुका हादरून गेलाय.
कालव्यात टाकला होता मृतदेह : अजित पोपट बुरूंगले (वय २४, रा. शिवाजीनगर, फलटण) हा घरातून निघून गेल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात रविवारी (दि. १७) दिली होती. मंगळवारी (दि. १९) विडणी गावच्या हद्दीत नीरा उजवा कालव्यामध्ये एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात तो मृतदेह अजित बुरूंगलेचा असल्याचं स्पष्ट झालंय.
लग्नापुर्वीपासून होते प्रेमसंबध : या घटनेचा गोपनीय पद्धतीनं तपास करत पोलिसांनी माहिती मिळवली. तसेच अजित याच्या पत्नीकडे केलेल्या चौकशीत तिनं लग्नापूर्वी करण विठ्ठल भोसले याच्याशी आपले प्रेमसंबंध होते, असं पोलिसांना सांगितलंय. प्रेमसंबधात पतीचा अडथळा येत असल्यानं करण भोसले याने त्याचा मित्र राहुल उत्तम इंगोले याची मदत घेतली. तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला होता.
प्रेयसीच्या पतीचा प्रियकरानेच काढला काटा : करण भोसलेनं रविवारी रात्री प्रेयसीचा पती अजित याला फोन करून घराबाहेर बोलावून घेतलं. घराबाहेर आल्यानंतर दोघांनी अजितचा दोरीनं गळा आवळून खून केला. त्यानंतर हात पाय बांधून मृतदेह नीरा उजवा कालव्यामध्ये टाकला, अशी कबुली मुख्य संशयित करण विठ्ठल भोसले याने दिलीय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिलीय.
प्रेयसीसह प्रियकराला अटक, मित्र फरार : पतीच्या हत्येप्रकरणी मृत अजितची पत्नी आणि तिचा प्रियकर करण भोसले यांना अटक करण्यात आलीय. त्याचा मित्र राहुल इंगोले हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील शेळके करीत आहेत.
हेही वाचा :