सातारा - महाराष्ट्राला परिचीत असलेला साताऱ्यातील माणदेश हा भाग. या भागात आजही पाण्याचा दुष्काळ आहे. येथील नागरिकांनाही मदतीची गरज आहे पण मदत होत नाहीये. अशा परिस्थीतीतही येथील नागरिकांनी सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. पाण्याचा दुष्काळ असलेल्या माणदेशातील जनतेनेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पूढे केला आहे.
दुष्काळाची छाया असलेले माणदेशही मदतीत मागे नाही
"आमच्या कडे पाण्याचा दुष्काळ जरूर आहे. मात्र मदतीचा सुकाळ देखील आहे." असे येथील तरूणांनी सांगितले आहे. पूर्ण माणदेशातून प्राथमिक स्वरूपात भाकरी भाजी, चटणी, लोणचे तर दुसऱ्या टप्प्यात एक महिना पुरेल असे धान्य प्रत्येक कुटुंबाला पाठवणार आहोत. सध्या प्रत्येक घरातून रोज पाच भाकरी व भाजी, चटणी गोळा करून दिली जात आहे. या सर्व अन्न, वस्तू, जिवनोपयोगी साहित्य यांना एकत्र करण्याचे व पॅकींग करण्याचे काम माण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण दहिवडी येथे सुरू केले गेले आहे.
दोन दिवसात नियोजन करून अनेक शेतकरी व चार छावण्यामधील पशु पालक आपल्या घरातून प्रत्येकी दहा किलो धान्य जमा करून पूरग्रस्त सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पाठवणार आहोत. आज या ठिकाणाहून चार ट्रक सांगली जिल्ह्यात पाठवण्यात आले आहेत तर उद्या कोल्हापूरला पाठवले जाणार असल्याची माहितीही नागरिकांनी यावेळी दिली आहे.