सातारा - दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानणारा सातारा जिल्हा असून या जिल्ह्याला सुसंस्कृत लोकशाहीची परंपरा लाभली आहे. यामुळेच लोकांनी मला प्रचंड बहुमतांनी विजयी केले. हा विजय राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठा विजय असून, तो मी पक्षाला व साताराच्या जनतेला अर्पण करतो, अशी भावना राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.
विजयानंतर श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले, 'जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. प्रत्येक मतदाराला वाटले की, आपणच उमेदवार म्हणून उभे आहोत आणि मतदान केले पाहिजे. यामुळे प्रचंड मते देऊन जनतेने माझ्यावर विश्वास प्रकट केला.'
ऐंशी वर्षाची व्यक्ती भरपावसात कुठलीही छत्री न घेता मनापासून कष्ट घेते. मागे केलेली चूक सुधारण्याकरता मी आज आपल्या दारी मत मागण्यासाठी आलो आहे, आपले मत राष्ट्रवादी व काँग्रेस मित्र पक्षांच्या उमेदवारांना आणि श्रीनिवास पाटील यांना द्यावे, असे शरद पवार यांनी केलेले आवाहन लोकांना योग्य वाटले. म्हणून लोकांनी राष्ट्रवादीला भरभरुन मतदान केले. मी लोकशाही मार्गाला धरून लोकहिताची कामे करेन, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने, साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. त्यात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील तर भाजपकडून उदयनराजे यांनी पोटनिवडणूक लढवली. यात पाटील यांनी भोसले यांचा दारुण पराभव केला. शरद पवार यांनी पाटील यांच्यासाठी भरपावसात साताऱ्यात घेतलेली सभा देशभरात चर्चिले गेली.