सातारा - सरकार विरोधातील आंदोलनात नुकसान सामान्य माणूस आणि व्यापार्यांचे होते. त्यामुळे २९ तारखेला बुधवारी होणाऱ्या आंदोलनात तसेच यापुढे होणारा कोणताही बंद व्यापारी पाळणार नाहीत, असे निवेदन सोमवारी कराडमधील व्यापार्यांनी सातारा जिल्हाधिकारी, कराडचे पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदारांना दिले आहे.
एनआरसी आणि सीएए कायद्याच्याविरोधात शुक्रवारी (दि. २४) महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. आता पुन्हा बुधवारी (दि. २९) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सातत्याने बंदचे आवाहन होत असल्यामुळे कराडच्या व्यापारी बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्रासलेल्या व्यापार्यांनी बुधवारच्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापुढे कोणताही बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात व्यापार्यांनी सोमवारी सातारा जिल्हाधिकारी, कराडचे पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.
महापूरामुळे कराडच्या व्यापारी पेठेचे मोठे नुकसान झाले. त्यातच मागील वर्षात तब्बल १५ ते २० वेळा बंद पाळण्यात आल्यामुळे त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसला. आजुबाजूला झालेल्या मॉलमुळे आधीच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यात सतत बंद आणि आंदोलने होत असल्याने व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. बुधवारच्या भारत बंदमध्ये आणि यापुढील कोणत्याही बंदमध्ये कराडचे व्यापारी सहभागी होणार नाहीत, असे व्यापार्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.