कराड (सातारा) - राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे मंगळवारी सकाळी कराड येथून मुंबईला रवाना झाले. दि. १४ आॅगस्टला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून कराडच्या कृष्णा रुग्णालयात ते उपचार घेत होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी कृष्णा रुग्णालयात जाऊन बाळासाहेब पाटील यांच्या तब्येतीची चाैकशी केली. त्यांच्या कुटुंबीयांशी आराेग्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर पाटील यांना उच्च रक्तदाब आणि मुधमेहाचा त्रास असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. वैद्यकीय अधिकारी आणि कुटुंबीयांच्या चर्चेअंती बाळासाहेब पाटील यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी सकाळी बाळासाहेब पाटील हे सुसज्ज रूग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना झाले. तत्पुर्वी त्यांनी आपली तब्येत उत्तम असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानूसार आणि आरोग्यमंत्री राजेश टाेपे यांच्या विनंतीनूसार उपचारासाठी मी मुंबईला जात आहे. साेशल डिस्टन्सिंगसह मास्क, हॅन्डग्लाेव्हजचा वापर तसेच स्वच्छता ठेऊन जनतेने काळजी घेण्याचे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले.