कराड (सातारा) - लग्न कार्यास परवानगी घेतल्यानंतर बँड-बँजो वाद्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचे साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जाहीर केले. यामुळे बँड-बँजो पथकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर काही महिने निर्बंध आले होते. टप्प्याटप्प्याने शासनाने कार्यक्रमांना परवानगी दिली. लग्न कार्यासाठी नियम-अटींसह परवानगी देण्यात आली. परंतु, बँड आणि बँजो पथकांसाठी स्पष्ट निर्देश नसल्याने सातारा जिल्ह्यातील बँड-बँजो वादक संघटनेच्या पदाधिकार्यांनी साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नुकतीच भेट घेतली. लग्न कार्यासाठी एकदा तहसील कार्यालयातून परवानगी घेतल्यानंतर वाद्य वाजवणार्या बँड आणि बँजो पार्टीला वेगळी मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या नियमाप्रमाणे लग्न कार्य पार पाडणे बंधनकारक आहे. लग्न कार्यात मर्यादित नागरिकांची उपस्थिती असावी. तसेच, वाद्य बँड आणि बँजो पार्टीसाठी वेगळ्या परवानगीची गरज नसल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे, वाद्य पथकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कराड येथील प्रसिद्ध संगम बँड पथकाचे मालक हणमंत माने यांनी जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचेही सांगितले.
हेही वाचा - म्हसवडच्या सिद्धनाथांचा शाही विवाहाचा सार्वजनिक सोहळा रद्द; मंदिरही राहणार बंद