सातारा Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील दोन खुनाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. कोरेगावातील 12 वर्षाच्या मुलाच्या खून प्रकरणी जन्मदात्या पित्यास अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत मानवी सांगाडा आढळलेल्या तरुणीची ओळख पटवून तिचा खून करणाऱ्या भावाला पोलिसांनी अटक केलीय. कोरेगावमधील 12 वर्षाच्या मुलाचा जन्मदात्या पित्यानं तर मानवी कवटी आढळून आलेल्या तरुणीचा तिच्या भावानंच खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. खुनाच्या दोन्ही घटनांमागील धक्कादायक कारणही पोलीस तपासात समोर आलंय.
- दोन दिवसांत गुन्हा उघड : कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील 12 वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून करुन मृतदेह उसाच्या फडात टाकला होता. गुन्हा घडल्यापासून एलसीबी आणि वाठार स्टेशनचे पोलीस गावात तळ ठोकून होते. वडिलांनी मुलाचा खून केल्याचा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी शाळकरी मुलाचे वडील विजय खताळ यांना ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली.
मुलाच्या खुनाचं धक्कादायक कारण : पोटच्या मुलाच्या खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्या विजय खताळ याची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत त्यानं खुनाचं धक्कादायक कारण सांगितलंय. 'मला कॅन्सर आहे. माझ्या पश्चात मुलाचा सांभाळ कोण करेल. त्यालाही कॅन्सर होईल. त्याचे हाल होतील. या विवंचनेतून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला असल्याची कबुली आरोपी पित्यानं दिलीय.
बदनामीच्या कारणावरुन भावाकडून बहिणीचा खून : दुसऱ्या घटनेत खंडाळा तासुक्यातील गुठाळे गावच्या हद्दीत मानवी सांगाडा आढळून आला होता. या मानवी सांगाड्याची ओळख पटवली असता तो मृतदेह बिहारमधील एका 19 वर्षीय तरुणीचा असल्याचं स्पष्ट झाले. मानवी कवटीवरुन शोध घेत पोलिसांनी दहा दिवसांत या तरुणीच्या खुनाचा छडा लावला. बिहारमधील मूळ गावातील तरुणासोबत असलेले बहिणीचे प्रेमसंबंध भावाला पसंत नव्हते. त्यामुळं त्यानं स्कार्पनं गळा आवळून बहिणीचा खून केल्याची कबुली आरोपी शंकर जिमदार महतो यानं पोलिसांना दिलीय.
हेही वाचा :