सातारा : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडली आहे. कोळशाच्या कारखान्यात काम करणार्या आदिवासी मजूर महिलेवर 11 जणांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पतीला खोलीत डांबून पीडितेवर 11 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सातारा पोलिसांनी कोळसा कारखान्याचा मालक आणि मुख्य संशयित बाळू शेख याला ताब्यात घेतले आहे.
पतीला खोलीत डांबून महिलेवर अत्याचार : फलटणमधील एका लाजिरवाण्या घटनेने सातारा जिल्हा हादरला आहे. फलटण तालुक्यातील परिसरात कोळसा कारखान्यात काम करणार्या कातकरी महिलेवर तब्बल 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. यावेळी नराधमांनी पीडितेच्या पतीला खोलीत डांबून सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. नराधमांच्या तावडीतून पती आणि महिलेने स्वत:ची सुटका करत पाच वर्षाच्या मुलीसह पंढरपूर गाठले. तेथून पुन्हा रायगडला आपल्या गावी गेल्यानंतर त्यांनी मामाला घटनेची माहिती दिली. त्यामुळे पीडितेच्या मामाने पीडितेला घेऊन पोलीस ठाणे गाठले.
श्रमजीवी संघटनेमुळे घटना उघड : रायगडमधील एक कातकरी कुटुंब फलटण येथे कोळसा कारखान्यात कामाला होते. त्याच परिसरातील पालामध्ये ते राहत होते. तेथील 11 जणांनी पतीला खोलीत डांबून पीडितेवर अत्याचार केला. अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडिता आणि तिच्या पतीने सुटका करून घेत पाच वर्षाच्या मुलीसह रात्रीच पंढरपूर गाठले. तेथून ते रायगडला आपल्या गावी गेले. पीडित महिला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
पोलीस ठाण्यात मामासह घेतली धाव : पीडित महिलेला घेऊन मामाने रायगड जिल्ह्यातील मांडवी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित महिलेची सविस्तर तक्रार नोंद करून सातारा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सातारा पोलीस जबाब नोंदवण्यासाठी पीडित महिलेला सातार्यात घेऊन आले. पीडितेने घडलेला प्रकार कथन केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कोळसा कारखान्याचा मालक बाळू शेख याला ताब्यात घेतले आहे.
सातारा जिल्ह्यात खळबळ : या लाजीरवाण्या घटनेने पुरोगामी आणि क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्याची मान शरमेने झुकली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयितांची धरपकड सुरू केली आहे. कोळसा कारखान्याच्या मालकाला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक आज या घटनेची माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत.