सातारा - केंद्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामांतर केले. केंद्राच्या या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याप्रमाणे समाजमाध्यावर या निर्णयामुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही होताना दिसत आहे. मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने असलेल्या या पुरस्कारे नाव बदलल्याने यामागे केवळ राजकारण असल्याची टीका करत काँग्रेसमधून तीव्र पडसाद उमटले आहेत. साताऱ्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. क्रीडा क्षेत्रात गेल्या आठ वर्षांत केंद्राने जो खेळखंडोबा चालवला आहे, तो नाव बदलून थांबणार असेल तर केंद्र सरकारने अशा पुरस्कारांचे जरूर नाव बदलावे, अशा प्रतिक्रिया साताऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहेत. या नामांतराच्या वादानंतर काँग्रेसला क्रीडा क्षेत्राविषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याचा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला हा विशेष आढावा...
![खेलरत्न पुरस्काराच्या नावावरून राजकारण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/str-politics-from-sports-gem-awards_07082021212355_0708f_1628351635_152.jpg)
"भारतभरातील नागरिकांकडून मला खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या मतांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करत, खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात येत आहे. जय हिंद! मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते ज्यांनी भारताचा सन्मान वाढविला. आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्याच्या नावावर ठेवला जाणे योग्य आहे", असे ट्विट करत मोदींनी योग्य वेळ साधली आणि राजीव गांधी यांचे नाव बदलले. यावरून हे केवळ राजकीय हेतूने केले असल्याची टीका काँग्रेसमधून उमटू लागली आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात खेळखंडोबा सुरू असल्याची टीकाही सातारा काँग्रेसने केली आहे.
क्रीडाविषयक बजेटमध्ये कपात का?
साताऱ्यातही या निर्णयाचे उलटसुलट पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. प्रदेश काँग्रेसच्या चिटणीस रजनी पवार 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या, "आधुनिक भारताचे नायक म्हणून राजीव गांधी यांच्याकडे पाहिले जाते. मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध असायचं कारण नाही, पण याच पंतप्रधान मोदी यांची समयसूचकता गुजरातच्या स्टेडियमला स्वतःचे नाव देताना कुठे गेली होती? ऑलम्पिक स्पर्धा असताना क्रीडाविषयक बजेटमध्ये त्यांनी कपात केली. यावरून क्रीडा विषयात पंतप्रधान किती गंभीर आहेत हे दिसून येते.
नाव बदलल्याने फरक पडत नाही -
पुरस्काराचे नाव काहीही द्या, त्याने फरक पडत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात व्यापक जनहित लक्षात घेऊन उभ्या केलेल्या संस्था मोडीत काढण्याचे काम मोदी सरकार करत आहे. बीसीसीआय च्या सचिवपदी राजकीय व्यक्तीची नेमणूक करून या सरकारने क्रीडा क्षेत्रात चालवलेला राजकीय हस्तक्षेप व खेळखंडोबा थांबवावा, असे मत जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अमर करंजे यांनी व्यक्त केले. 'काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांचा द्वेष या एकमेव हेतूने मोदी सरकारने एक कलमी कार्यक्रम राबवला आहे,' अशी टीका सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.
![खेलरत्न पुरस्काराच्या नावावरून राजकारण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/str-politics-from-sports-gem-awards_07082021212355_0708f_1628351635_273.jpg)